विकासाच्या भगवानाला शुभेच्छा!

आज असलदे गावाचे सुपुत्र, असलदे श्री. रामेश्वर विविध सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, पत्रकार श्री. भगवान सुरेश लोके यांचा आज वाढदिवस! त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शब्दरूपी पुष्पांचा लेख! आमच्या पाक्षिक `स्टार वृत्त' परिवाराकडून श्री. भगवान सुरेश लोके यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! असलदे गावाच्या विकासासाठी त्यांच्या कार्याला श्री रामेश्वर बळ देवो ही सदिच्छा! 

`असलदे गावाचा सर्वांगिण विकास व्हावा!' असं मला गेली ४२ वर्षे वाटत आहे. त्यासाठी मी माझ्या कुवतीप्रमाणे सदैव प्रयासशील असतो. असा प्रवास करणारा `मी एकटाच आहे!' असं मी कधीच मानले नाही आणि मानणार नाही. आजपर्यंत मी गावातील अनेक आदर्श व्यक्तीमत्वांचा लिखाणाच्या माध्यमातून मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आणि पुढेही करेन. त्याचाच एक भाग म्हणजे आजचा हा लेख!  

विकासाची संकल्पना जेव्हा मांडली जाते तेव्हा ती सर्वांना सामावून घेणारी असावी लागते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाभेद करता येत नाही. गावात राजकीय पक्षाचे राजकारण असता कामा नये, गटाचे-तटाचे-जातीचे राजकारण असता कामा नये; असं मी मानतो. पण गेल्या २०-२५ वर्षात राजकीय पक्षांनी गावात आपली पाळंमुळं खोलवर पोहचवली; हे सत्य आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या राजकारणाशिवाय पर्याय नाही आणि त्यास असलदे गावही अपवाद नाही. अशा वातावरणात गेली १० वर्षे श्री. भगवान सुरेश लोके यांनी असलदे गावाच्या विकासासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. पत्रकार म्हणून जिल्ह्यात अभिनंदनीय पत्रकारिता करताना नाव कमावले आणि दुसऱ्या बाजूला असलदे गावच्या विकासाला सर्वोतोपरी सहकार्य केले; हे विशेष! 

असलदे श्री रामेश्वर विविध सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी भगवान लोके यांची झालेली निवड खऱ्या अर्थाने असलदे गावाच्या विकासाला तारक ठरली. गेल्या दोन वर्षाच्या अत्यल्प काळात सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य असलदेवासियांना आर्थिक सक्षमता देणारे ठरले आहे. ४० वर्षांनी असलदे श्री रामेश्वर विविध सहकारी सेवा सोसायटी अध्यक्षांच्या खुर्चीला न्याय देणारा अध्यक्ष भगवान लोके यांच्या रूपाने मिळाला; हे अभिमानाने सांगावेसे वाटते. कोणत्याही गावाचा विकास सोसायटी आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून होत असतो. सोसायटीच्या अध्यक्षपदी भाचा भगवान लोके आणि असलदेच्या सरपंचपदी मामा चंद्रकांत डामरे असा योगायोग नियतीने जुळवून आणला; तो असलदे गावाच्या विकासासाठीच; हे मान्य करावे लागेल. 

ओटव धरणातून असलदे गावात कालवा असावा; जेणेकरून गाव ओलिताखाली येईल; ही संकल्पना कित्येक वर्षे माझ्या डोक्यात होती. ती जून महिन्यात मी पत्रकार भगवान लोके यांना बोलून दाखविली. त्या संकल्पनेवर आपण काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाहीतर शासन दरबारी प्रक्रिया त्यांनी सुरु केली. ह्याचा मला खूप मोठा आनंद झाला. कारण ह्या कालव्याच्या माध्यमातून गावात हरितक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. ह्याचे श्रेय भगवान लोके यांना दिले पाहिजे. 

भविष्यात असलदे गावाच्या विकासासाठी अनेक संकल्पना मूर्त स्वरूपात आणाव्या लागतील. त्यासाठी भगवान लोके यांनी आपले योगदान द्यावे; अशी माझी इच्छा आहे. भगवान लोके म्हटलं की खूप काही लिहिण्यासारखं आहे; नंतर ते नक्कीच लिहू. पण आजचा लेख पुन्हा त्यांना शुभेच्छा देऊन समाप्त करतोय. 

-नरेंद्र राजाराम हडकर

Comments