देवाच्या काठीला आवाज नसतो; पण...


राजकीय पक्षांचे राजकारण देशपातळीपासून तालुका पातळीपर्यंत मान्य करता येतं; पण तेच पक्षीय राजकारण जेव्हा गावात, वाडीत किंवा भावकीमध्ये येतं तेव्हा मात्र गावाचा, वाडीचा भावकीचा संघटनात्मक विनाश ठरलेला असतो. गावात प्रत्येकाच्या सुख- दुःखात एकमेकांना सहकार्य करणारे एकमेकांचे दुष्मन होतात; त्याला निमित्त असतं राजकारणाचं!  म्हणूनच असलदे गावात राजकीय पक्षाचे राजकारण नको, असे गेल्या ३० वर्षात ठामपणे मी माझे मत मांडतो आणि यापुढे मांडत राहीन. पण स्वस्वार्थासाठी राजकीय पक्षांच्या आधारे गावात गेल्या दहा-पंधरा वर्षात राजकारण आणून गावाची एकी नासवली गेली, विकासाच्या कामांमध्ये निकृष्टता आणली गेली, गावाच्या विकासाबद्दल- नैतिकतेबद्दल सत्य व वास्तव मांडणाऱ्यांच्या विरोधात गलिच्छ, नीच, सैतानी डावपेच आखले गेले. माझ्यासह अनेक प्रामाणिक, कार्यक्षम माणसांना प्रचंड त्रास दिला गेला; हे वास्तव आहे!

डिसेंबर २०२२ मध्ये जेव्हा ग्रामपंचायत निवडणूक झाली तेव्हाही मी असलदे गावात पक्षीय राजकारण नको; म्हणून स्पष्टपणे मत मांडले होते. तो लेख पुढील लिंकवर क्लिक करून वाचता येईल. (इथे क्लिक करा!- बिनविरोध निवडणूक करून गावातील द्वेष भावना संपवा!)

शेवटी ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांमार्फत निवडणूक झाली. त्यास जबाबदार असणाऱ्या मंडळींचा पराभव झाला. पण आज जिंकून आलेले पराभूत झालेल्याच्या पक्षात गेले. ह्याचा अर्थ अनेक प्रकारे लावता येऊ शकतो आणि असू शकतो. तरीही ह्या पक्षांतराच्या मागे गावाच्या विकासाची झालर आहे की स्वस्वार्थची पगडी आहे की दबावतंत्र आहे; हे सामान्य मतदार म्हणून समजून घेण्यासाठी थोडे दिवस लागणार आहेत. 

पक्षीय राजकारणाने गावाचा नव्हे तर गावातील पक्षीय नेत्यांचा अधिक विकास होतो; हे आपण अनुभवतो म्हणूनच गावपातळीवर पक्षीय राजकारण दूर ठेवणे अत्यावश्यक असते. पण एक आंबा कुजला की पेटीतील अनेक आंबे कुजतात. म्हणून सुरुवातीलाच एक कुजलेला आंबा आंब्याच्या पेटीबाहेर काढायचा असतो. तसा प्रयत्न मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी २०१७ साली केला. त्यात राजकीय पक्षांच्या सैतानी, गलिच्छ, नीच राजकारणाने आमचा पराभव झाला आणि आता पूर्ण आंब्याची पेटी कुजली आहे. हा दोष आम्हा प्रत्येकाचा नाही का?   

आम्ही स्वतंत्र भारतात राहतो आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही आमच्या देशात आहे. आम्हा प्रत्येकाला विचार मांडण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले. पण आम्ही गावात, वाडीत वावरताना बघ्याची भूमिका घेतो, संबंध बिघडतील म्हणून खोट्याला खोटा आणि चुकीला चूक म्हणण्याचा स्वाभिमान घरच्या खुंटीला बांधून ठेवतो. सत्याची बाजू घेतली तरी आणि असत्याला, अन्यायाला विरोध केला नाही तरी आपण एक ना एक दिवस मरणार आहोत. त्यापेक्षा असत्याच्या, गैरकारभाराच्या, भ्रष्टाचाराच्या विरोधात ठामपणे मत मांडून मोठ्या स्वाभिमानाने रोखठोकपणे जगणं नक्कीच चांगलं. अशा रोखठोक बिनधास्त माणसांमुळेच जगात सामाजिक क्रांत्या झाल्या, भारत स्वतंत्र झाला, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी प्रकट केली. पण अन्याय, अत्याचार सहन करायचा... घाबरत घाबरत भेकडपणे जीवन जगायचं... हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या स्वार्थी लोकांचे अधिपत्य मान्य करायचे... हे योग्य नाही. हा संस्कार आम्ही पुढच्या पिढीला, आमच्या मुलांना देतो. हीच काय आमची संस्कृती? हाच काय आमचा स्वाभिमान? याचा विचार गावातील प्रत्येकाने करायला पाहिजे. माझ्या असलदे गावात खऱ्या अर्थाने लोक निर्भयपणे वागले पाहिजे; असं मला वाटतं. 

जर ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपांशिवाय झाली असती तर आज गाव म्हणून समर्थणे आपण सर्व उभे राहिलो असतो आणि हा पक्षांतरचा तमाशा झालाच नसता. पण आता गाव म्हणून आम्ही कोणतेही निर्णय स्वच्छपणे घेऊ शकत नाही. कारण राजकीय पक्षांचे प्रतिनिधीच गावाची भूमिका ठरविण्यास ताकदवान झाले आहेत. ही ताकद ``उगाच दुष्मनी कशाक?'' ``उगाच संबंध बिघडून कशाक घ्यायचे?'' अशा आमच्या वृत्तीमुळेच वाढली आहे. आता आमच्या हातात एकच आहे, श्री रामेश्वराला, श्री पावणाई मातेला, श्री चाळेश्वराला आणि प्रत्येक वाडीतील देवतांना सांगणं करू... ``देवा सर्व काही ठीक कर!'' आमचा त्या परमात्म्यावर आणि परमात्म्याच्या कार्यावर शुद्ध श्रद्धेसह दृढ विश्वास आहे. देवाच्या काठीला आवाज नसतो; पण वळ लई जबरी उठतो, दणका जोरात असतो. 

तूर्तास थांबतो! 

-नरेंद्र हडकर

संपादक- पाक्षिक `स्टार वृत्त'  

Comments