स्टोन क्रेशरला जोरदार विरोध करून परवानगी नाकारणाऱ्या ग्रामास्थांनो त्रिवार धन्यवाद!



आता पुढची कायदेशीर लढाई जिंकण्यासाठी सज्ज व्हा आणि स्टोन क्रेशर रूपी राक्षसाला गाढा!

असलदे गावातील ग्रामस्थांनी १९ डिसेंबरच्या ग्रामसभेत स्टोन क्रेशरला जोरदार विरोध करुन ग्रामपंचायतीने स्टोन क्रेशरला परवानगी देऊ नये, असा पुन्हा एकदा ठराव केला. गावाच्या मुळावर आलेल्या राक्षसाला नाकारले; त्याबद्दल ग्रामस्थांचे मन:पुर्वक त्रिवार धन्यवाद!

स्टोन क्रेशर समर्थकांकडून गावातील ठराविकजणांना अनेक `गाजरं' दाखविण्यात आली. अनेक बैठका झाल्या. पुन्हा एकदा गटातटाचे, जातीचे, पैशाचे राजकारण केले गेले. गावातील अनेक रस्ते करण्याचे गाजर, विकास कामे करण्याचे गाजर, नोकरी देण्याचे गाजर; अशी अनेक गाजरं दाखविण्यात आली. पण शेवटी गावाच्या भल्याचा विजय झाला आणि ती `गाजरं' खाण्याशिवाय समर्थकांकडे पर्याय उरला नाही.

१९ डिसेंबरच्या ग्रामसभेत असलदे गावातील ग्रामस्थांनी घेतलेली भूमिका खरोखरच कौतुकास्पद आहे. पण ग्रामपंचायतीने पुर्वीचा स्टोन क्रेशरला परवानगी नाकारणारा ठराव वरिष्ठांकडे मुद्दामहून उशिरा पोहचविला; हे सर्व ग्रामस्थांपुढे उघड झाले; हे बरं झालं. लोकहिताच्याबाबतीत ग्रामपंचायतीची ही भूमिका चीड-संताप आणणारीच नव्हेतर गावाशी नीचपणा करणारी आहे. पंचायतराज व्यवस्थेत गावाचा सर्वांगिण विकास हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होऊ शकतो. गावातील मंदिरांचा व मंदिराच्या परिसरातील विकास हा ग्रामपंचायतीने करायचा असतो. आजपर्यंत ग्रामपंचायतीत बसणाऱ्यांना हे शक्य झाले नाही. हे दुर्दैव आहे. त्याचा उलट फायदा घेऊन क्रेशर मालकाकडून विकास करण्याचे गाजर दाखविणे गैर नाही काय? असो.......

आता पुढे काय? असलदे गावात स्टोन क्रेशर सुरु करण्यासाठी प्रशासनाच्या व राजकारणाच्या वरिष्ठ पातळीवरुन हालचाल होणार आहे. तेव्हा दक्ष राहून लोकशाही मार्गाने लढाई करावी लागेल. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत, मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत जाण्याची नियोजनबद्ध तयारी करावी लागेल. त्यासाठी नामवंत तज्ञ वकील, पर्यावरणावर कार्य करणारे तज्ञ व राष्ट्रीय पातळीवरील सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी लागेल. त्याची तयारी आतापासूनच करावी लागेल. तहान लागल्यावर विहीर खणता येत नाही म्हणूनच गावातील प्रत्येकाने एक होऊन ह्याचा सखोल विचार केला पाहिजे. गावात प्रदुषणकारी कारखाना होता कामा नये, हे महत्वाचे! गावाच्या भल्यासाठी ही भूमिका असणे गरजेचे आहे. मी ज्या मंडळांमध्ये पदाधिकारी आहे त्या मंडळांचा ९९ टक्के पाठींबा माझ्या ह्या भूमिकेला आहे. त्यांचेही मनापासून धन्यवाद मानले पाहिजेत. त्यांच्याच पाठींब्यामुळे मी माझी भूमिका अधिकाधिक ग्रामस्थांपर्यंत पोहचवू शकलो. 

सर्वांना एकत्र घेऊन पुढील धोरण आखताना प्रत्येकाने वेळ आणि पैसा खर्च करण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्याचबरोबर प्रामाणिक व कार्यक्षमता हे गुण आवश्यक असणार आहेत. वेळप्रसंगी पोलिसांच्या लाट्याही खाव्या लागतील. खोट्या आरोपांखाली तुरुंगात जावे लागेल. अपप्रचार-बदनामी केली जाईल. ही सर्व मानसिकता तयार करावी लागेल; तेव्हाच पुढील लढाईतही यशस्वी होऊ! हे यश श्रीरामेश्वर, श्रीपावणाई निश्चितच देईल! नंतर पुन्हा भेटूच ...... धन्यवाद!!! 

पहिला लेखाला आपण जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात व साधकबाधक चर्चा केली; त्याबद्दल आभारी!

–नरेंद्र राजाराम हडकर

(२०/१२/२०१७) 


Comments