वाचावा हो आमची शाळा...!


आज अतिशय दुःखद गोष्ट मला समजली; ती माझ्यासाठी जेवढी दुःखद आहे, तेवढीच ती तुमच्यासाठीही असेल. कारण आपण ज्या असलदे गावच्या मधलीवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले, ती शाळा ह्या जून महिन्यामध्ये बंद पडण्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. आपल्या शाळेची एकूण पटसंख्या होती दहा. त्यातील चार मुले चौथी पास होऊन माध्यमिक शाळेत जाणार आहेत. ह्यावर्षी पहिलीमध्ये एकही प्रवेश होण्याची शक्यता नसल्याने आता ही शाळा दुसऱ्या शाळेत वर्ग होऊ शकते! त्यामुळे आपल्या सर्वांसाठी भूषणावह असलेली शाळा जून महिन्यापासून सुरु होणार नाही. हीच ती दुःखद गोष्ट! 

आपल्या ह्या शाळेला १० डिसेंबर २०१३ साली १०० वर्षे पूर्ण झाली होती. ह्या शाळेतूनच आमची वडीलधारी मंडळी म्हणजेच आपले वडिलांची-आजोबांची पिढी शिकली. आपण जे आज सुशिक्षित आहोत ते ह्याच शाळेमुळे! अक्षरशः ह्या शाळेने आपल्या गावात शैक्षणिक क्रांती घडविली आणि त्याचा आपल्याला लाभ झालाय. हे आपण कोणीही विसरता कामा नये. ज्या शाळेत आपल्या आजोबांची, वडिलांची पिढी शिकली आहे ती शाळा अशी बंद पडणे म्हणजेच त्या शाळेचा `मृत्यू' होणे होय! आणि कुठलाही मृत्यू वाईटच-दुःखदच! म्हणून आपण सर्वांनी जर मनापासून संघटित होऊन काही ठोस विचार केला तर आपली शाळा बंद होण्यापासून वाचवू शकतो. त्यासाठी आपल्या सर्वांना हृदयापासून-मनापासून वाटले पाहिजे की, आमची शाळा सुरु राहिली पाहिजे. 

आपल्या गावात आज अनेकजण उच्चविद्याविभूषित आहेत, सुसंस्कारित आहेत. अनेकजणांची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली आहे. अनेकजण आपल्या हिंमतीवर- कर्तृत्वावर विविध क्षेत्रात सर्वोच्च स्थानी आहेत. असे असताना ज्या शाळेने मला जीवनात यशस्वी होण्यासाठी मुळाक्षरे शिकविली, ती शाळा निरंतर सुरु राहण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करायला नकोत का? मला वाटतं आपल्या सर्वांचं उत्तर एकच असेल; आपली शाळा वाचली पाहिजे! ज्यांना शाळा सुरु राहावी असे वाटत असेल त्यांनी लगेच प्रतिक्रिया द्यावी; ही हात जोडून कळकळीची विनंती! कारण जे सकारात्मक असतील त्यांच्याशी संपर्क साधून त्या दृष्टीने सुनियोजित योजना आखता येईल. 

धन्यवाद!

-नरेंद्र हडकर

असलदे मधलीवाडीत असलेल्या प्राथमिक शाळेत शिकलेला एक विद्यार्थी

Comments