बिनविरोध निवडणूक करून गावातील द्वेष भावना संपवा!

 


सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून असलदे गावातही ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ घातलेली आहे. पाच वर्षांपूर्वी गावाच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न घेऊन आणि २०१२ ते २०१७ दरम्यान ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्ट कारभाराविरोधात निवडणूक लढविली; नव्हे ती निवडणूक लढविणे मला अत्यंत महत्वाचे वाटले; कारण २०१२ ते २०१७ दरम्यान ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्ट कारभाराविरोधात निवडणूक लढविण्यासाठी मी व माझ्या मित्रांनी गावात राहणाऱ्या अनेकांशी संपर्क साधून विनंती केली. पण आम्हाला कोणीही प्रतिसाद दिला नाही. शेवटी सरपंच पदासाठी भ्रष्ट व्यक्तीची बिनविरोध निवड झाली असती. शेवटी भ्रष्टाचाराविरुद्ध, गैरकारभारविरुद्ध, दारू व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध, गावात राजकीय तेढ उभं करणाऱ्यांविरुद्ध, भावकीत-वाडीत द्वेष निर्माण करणाऱ्यांविरुद्ध, गावात स्टोन क्रेशर आणण्याचा मनसुबा बाळगणाऱ्यांविरुद्ध मला २०१७ साली सरपंच पदाची निवडणूक लढवावी लागली. त्यात मतांच्या आकडेवारीत माझी हार करण्यात काही तथाकथित राजकीय स्व:स्वार्थ साधणारी मंडळी यशस्वी झाली. पण मागील पाच वर्षाचा कारभार पाहता ज्यांनी ज्यांनी मला हरविण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काम केले, ते आज पश्चाताप करीत आहेत. ह्यातच माझा विजय आहे हे मी मानतो. 

मात्र मी स्वतः निवडणूक लढविताना कोणताही पक्ष निवडला नाही. मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही. पक्षीय राजकारणाने गावाचे कसं वाटोळं होतं? ते मी गेली २५ वर्षे पाहतोय. तुम्हीही सर्वजण अनुभवता. पक्षीय राजकारणाने गावातील तीन चार व्यक्तींचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भले झालेले आपण पहिले. ह्याच माणसांना गावात पक्षीय राजकारण लागते; कारण त्यातूनच ते स्वतःचा स्वार्थ साधत असतात. म्हणूनच गावात किमान ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे; असं माझं स्पष्ट मत आहे. गाववाल्यांनू तुम्ही म्हणाल, गेल्या महिन्याभरात गावात पक्षीय राजकारणाचा धुरळा उडालेला असताना आता कसं शक्य आहे? 'गाव करी ते राव ना करी!' ही म्हण आपण म्हणतो. ते खरं आहे. गाव करी ते राव नाही करू शकत; हे लक्षात ठेवा! गावाबाहेरील व्यक्ती जर गावातील सलोख्याचे वातावरण बिघडवत असेल तर आम्ही गाव म्हणून कधी एक होणार? हा माझा प्रश्न आहे. 

२०१७ साली मी निवडणूक का लढविली? त्यावेळी गावाशी गद्दारी कोणी केली? हे मी पुढील लेखात स्पष्टपणे मांडणार आहे. पण आज असलदे गावाला किमान सरपंच पदी विराजमान होणारी व्यक्ती आम्हाला बिनविरोध निवडता आली पाहिजे. कारण गेल्या दहा वर्षात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वांगिण विकासाला मारक असे निर्णय घेण्यात आले, गावाच्या वेशीवर अवैध दारू व्यवसाय करण्यात आला, धर्मशाळेच्या बाजूला भरवस्तीत मोबाईल टॉवर उभा करून लोकांच्या आयुष्याशी खेळण्यात आले, भावकी भावकीत- वाडी वाडीत वाद निर्माण करण्यात आले, स्त्रियांना अपशब्द वापरण्यात आले, ग्रामपंचायतीत गैरकारभार करण्यात आला, नियमाला डावलून घरपट्टीचा जिझिया कर वसूल करण्यात आला, जो स्पष्टपणे गावाच्या विकासाची संकल्पना मांडतो त्याला त्रास देण्यात आला, एका आदर्शवादी शिक्षकाला वाडीच्या बाहेर ठेवण्यात आले. एवढेच नाहीतर मी निवडणूक लढू नये म्हणून गावात राहणाऱ्या माझ्याच भावकीतील एकाकडून सैतानी नीच राजकीय खेळी करून घेतली गेली. मलाही वाळीत टाकण्याचा मानस बोलून दाखविण्यात आला. पण माझ्याबरोबर गावातील-मुंबईतील माझे सहकारी समर्थपणे उभे राहिले. त्याकाळात मला देवमाणसं भेटली जी गावाच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. हाच माझा खऱ्या अर्थाने विजय होता. 

म्हणूनच गाववाल्यांनू, गावातील मतदारांनो आतातरी सावध व्हा! आम्हाला गावात द्वेष नको आहे. आम्हाला गावात मागील १० वर्षाचा भ्रष्ट कारभार नको आहे. त्यासाठी संघटीतपणे निर्णय घेऊ या! सरपंचपदी बिनविरोध निवड करू आणि गावात सर्वांगिण विकासाचे स्वप्न पूर्ण करू! त्यासाठी मी नेहमीच तयार आहे. पुन्हा पाच वर्षे वाया घालवूया नको! नाहीतर पुढील पिढी आम्हाला माफ करणार नाही. 

ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत किमान २० दिवस गावातच राहून अनेक गोष्टी ग्रामस्थांसमोर मांडायच्या होत्या; पण माझी सासू ३० नोव्हेंबरला देवाघरी गेली. त्यामुळे मला प्रत्यक्ष एवढे दिवस गावातच राहणे शक्य नाही. तरीही वेळ मिळेल तेव्हा तेव्हा लिखाणाच्या माध्यमातून मी माझी भूमिका तुमच्यासमोर मांडणार आहे. माझी भूमिका चुकीची वाटल्यास मला नक्की सांगा. मला तुमचं म्हणणं ऐकून घ्यायला नक्की आवडेल. जर माझी चूक असल्यास ती जाहीररित्या मान्य करीन. पण स्वस्वार्थासाठी स्वतःला विकणाऱ्या, भावकीला विकणाऱ्या, वाडीला विकणाऱ्या, गावाला विकणाऱ्या तथाकथित मूठभर लोकांची विकृती ठेचली गेलीच पाहिजे! त्यासाठीच सरपंच पदाची निवड बिनविरोध करा; ही नम्र विनंती! 

- नरेंद्र राजाराम हडकर

Comments