श्रीमाऊली `देवि'चा दास गेला देवीच्या सेवेशी हजर!



https://starvrutta.com/editorial-devidas-parab-mauli-devicha-das/

आज सकाळी देविदास राजाराम परब ६२ व्या वर्षी दिवंगत झाले. अतिशय दुःखद बातमी! त्यांच्या बाबतीत बोलणे आणि लिहिणे खरोखरच सहजसोपे नाही. आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता; पण अचानक काळाने घाला घातला आणि देविदास परबांचं पार्थिव घरी आणावं लागलं. अशा व्यक्ती जेव्हा अशा अचानक सोडून जातात तेव्हा शब्द निःशब्द होतात आणि नयनातून आपोआप अश्रू वाहू लागतात. कोणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्माला आला नाही; हे माहित असूनही देविदास परब सारखी सर्वांच्या शुभ प्रसंग असो वा अशुभ प्रसंग असो; प्रत्येक प्रसंगाला स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन काम करणारी व्यक्ती निघून जाते, तेव्हा जी पोकळी निर्माण होते; ती कधीही भरून न येणारी असते.

कोणाकडे साखरपुडा, पुण्याहवचन, लग्न, बारसं, वाढदिवस असल्यास देविदास नेहमीच हसरा चेहरा घेऊन थट्टा मस्करी करीत सहभाग घ्यायचे. तर दुसऱ्या बाजूला कोणी मृत पावल्यास त्या दिवसापासून अगदी वर्षश्राद्धापर्यंत लागणारे सर्व सहकार्य करण्यास तत्पर असायचे. सगळ्या आध्यात्मिक, धार्मिक, पारंपरिक विधी त्यांना माहित असायच्या आणि त्या विधी करण्यासाठी ते नेहमीच पुढे असायचे. प्रत्येकाशी आपलेपणाचे वैयक्तिक संबंध त्यांनी जोडून ठेवले होते. हीच खरी संपत्ती त्यांनी जमविली, जपली; हे विशेष!

गावाच्या, वाडीच्या कोणत्याही कार्यात देविदास परबांचा क्रियाशील सहभाग असायचा. परबांचा एक वर्ष आड देवीचा गोंधळ असतो. त्या गोंधळाच्या आध्यात्मिक उत्सवासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. मधलीवाडीत दरवर्षी श्रीसत्यनारायणाची महापूजा आणि श्रीदेवी माऊली मंदिराचा वर्धापन दिन साजरा होताना त्यांची हजेरी नुसती दर्शनासाठी नसायची; तर तो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांची धावपळ असायची. श्रीदेवी माऊली विकास मंडळ, मुंबईचे ते माजी सरचिटणीस! त्यांच्याच कार्यकाळात मधल्यावाडीत सुंदर भव्यदिव्य मंदिर उभे राहिले. त्यावेळी त्यांनी घेतलेली मेहनत कधीही विसरता येणार नाही. श्रीमाऊली `देवि'चा हा `दास' देवीच्या चरणांशी सेवा करण्यास हजर झाला.

असलदे विकास मंडळ, मुंबईचे त्यांनी सरचिटणीस म्हणूनही कार्य केले. संघटनेमध्ये काम करताना एखादा आक्रमक स्वभावाचा जर काही चिडून बोलला तरी त्यांनी नेहमीच सौजन्य दाखविले. असलदेतील रामेश्वर क्रीडा मंडळासाठी त्यांनी सुरुवातीच्या काळात आपल्या मित्रांकडून घेऊन तसेच स्वतःच्या खिशातील दिलेली आर्थिक मदत फार मोलाची होती. अशा व्यक्तींमुळे संघटना खऱ्या अर्थाने यशस्वी होतात. अनेक वर्षे मुंबईत टायपिंगचे आणि संगणकाचे क्लासेस चालविताना आलेल्या अनुभवाने त्यांच्यातील `शिक्षक' अधिकाधिक दर्जेदार झाला होता. तर अपना बँकेत नोकरी करताना प्रशासकीय सेवेचा त्यांना दांडगा अनुभव आला होता. त्यातच त्यांची पत्नी आदर्श `शिक्षिका' असल्याने त्यांचे लिखाण, वक्तृत्व, कामकाजाची पद्धत उत्कृष्ट होती.

त्यांनी आपल्या जीवनात खूप माणसं जोडली. त्या संपत्तीचे दर्शन अंत्ययात्रेत झालं. येताना काहीही आणायचं नाही आणि जाताना काहीही न्यायचं नाही; पण शेवटच्या दिवशी लोकांनी यावं; अशी ज्याची कार्य करण्याची पद्धत तोच खरा श्रीमंत आणि ती श्रीमंती देविदास परबांनी जपली. म्हणूनच अशा दुःखद प्रसंगी आपण जीवंत माणसांनी खूप काही शिकलं पाहिजे; कारण उद्याचा क्षण पाहण्यास कोण असेल? हे माहित नाही.

देविदास परब यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. त्यांना खूप बोलायचे होते, खूप काही करायचे होते. गावावर त्यांचे विशेष प्रेम! असे हे सर्वांचे लाडके देविदास परब आज आमच्यात नाहीत; ह्यावर विश्वासच बसत नाही. देविदास परब यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर जो दुःखाचा पर्वत कोसळला त्याचे वर्णन करता येणार नाही. त्या दुःखातून सावरण्याची ताकद त्यांना श्रीमाऊली देवीने द्यावी; ही प्रार्थना! त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात श्रीदेवी माऊली विकास मंडळ- मुंबई, असलदे विकास मंडळ- मुंबई, पाक्षिक `स्टार वृत्त' परिवार आणि आम्ही कुटुंबीय सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळो, ही परमात्म्या चरणी प्रार्थना!

देविदास परब यांच्यावर मृत्युलेख लिहिण्याचा प्रसंग माझ्यावर कधी येईल असं वाटलं नव्हतं. पण नियतीच्या समोर आम्ही काहीच करू शकत नाही; हे मान्य करावेच लागेल.

-नरेंद्र हडकर

Comments