असलदे सोसायटीची बिनविरोध निवडणूक- ममत्व आणि कवित्व!


बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन! 

राजकारणी गावातील जनतेला फसवितात; गाववाल्यांनी राजकारण्यांना फसविलं! 


खूप चांगली बातमी समजली. असलदे रामेश्वर विकास सोसायटीची निवडणूक यावर्षी बिनविरोध झाली आहे. खूप आनंद झाला. बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन! अभिनंदन करीत असताना अनेक प्रश्न मनामध्ये उभे राहिले आणि ते तुमच्याशी शेअर करणं अत्यंत गरजेचं वाटलं म्हणून हा लेखप्रपंच! 

प्रत्येक गावांमध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतात आणि ते आपापल्यापरीने गावामध्ये राजकारण करत असतात. गाव म्हटल्यानंतर ग्रामपंचायत आणि सोसायटी ह्या दोन संस्था ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा राजकारण्यांकडून केली जाते.  पाच वर्षांपूर्वी ह्याच सोसायटीची निवडणूक अगदी अटीतटीची झाली होती. हाणामारी होऊन एकाने मार सुद्धा खाल्ला होता. तेव्हा जर बिनविरोध निवडणूक झाली असती तर आम्हीही अभिनंदन केले असते. सोसायटीची बिनविरोध निवडणूक झाली असती तर भावकी असो वा वाडी पातळीवर राजकारणाचा तमाशा झाला नसता. पण गावातील लोकांना उल्लू बनविण्यासाठी तो सगळा `दशावतार' होता; एवढं निश्चित! असो! 

कालची निवडणूक बिनविरोध झाली. गावाचे राजकीय वातावरण खेळीमेळीचे राहिले. असे चित्र उभं करण्यात आमचे गावातील राजकीय पुढारी यशस्वी ठरले. मग पाच वर्षांपूर्वी ही उपरती का झाली नाही? आपल्या स्वार्थासाठी भावकीचा-वाडीचा वापर का करण्यात आला? 

सोसायटीच्या माध्यमातून गेल्या २५-३० वर्षात किती शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला? ह्या सोसायटीत गावातील लोकांनी सदस्यत्व घ्यावं; जेणेकरून सदस्य संख्या वाढेल, सोसायटीच्या माध्यमातून आर्थिक फायदा होईल! असं सोसायटीच्या चेअरमन यांना का वाटले नाही? हा आमचा सवाल आजचा नाही. सोसायटीची निवडणूक आली की सांगायचं आमच्या भावकीला-वाडीला विरोध केला जातोय आणि माथी भडकावयाची. ह्या फालतू स्वार्थी हेतूनेच गावात राजकारण केलं गेलं आणि गावाच्या विकासाबाबत ठणठण गोपाळा झाला. गावाबद्दल आत्मयितेने बोलणाऱ्या, गावाच्या विकासाबद्दल प्रामाणिक असणाऱ्या माणसांबद्दल नेहमीच खोटंनाटं सांगून बदनामी करायची, त्यांना गुंड ठरवायचं आणि आपला स्वार्थी हेतू साध्य करायचा; हे अनेक वर्षे सुरु आहे. आज किंवा उद्या हे थांबेल, असं नेहमीच वाटायचं. पण ते आता भविष्यातही थांबेल असं वाटत नाही. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता काम नये. म्हणून आतातरी स्पष्ट बोलण्याशिवाय गत्यंतर नाही. तेच काम आम्ही केलं पण मान, मर्यादा, आपुलकी, गावावरील प्रेम, लहानपणापासून गावाबाबत असलेल्या विकासाच्या संकल्पना; ह्या सर्व गोष्टींमुळे वेग कमी होता. आता पुढे मात्र तो वेग कोणाला रोखता येणार नाही. २०१७ साली सरपंच पदाची निवडणूक का लढविली आणि नेमकं काय झालं? ह्याचासुद्धा समाचार आम्ही लवकरच घेऊ! असो. 

गावाचा  मूलभूत-पायाभूत विकास हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत असतो; तर  सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास होणे अपेक्षित असतं.  पण आम्हा ग्रामस्थांच्या दुर्दैवाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो काही मूलभूत-पायाभूत विकास व्हायला हवा तो झालेला दिसत नाही. त्याचप्रमाणे सोसायटीच्या माध्यमातून गेली २५-३० वर्षे गरीब कष्टकरी शेतकऱ्यांना जो फायदा व्हायला हवा होता; तो झाला की नाही? हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. यासंदर्भात आम्ही नेहमीच स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. 

मी स्वतः कुठल्याही राजकीय पक्षाचा समर्थक किंवा सदस्य नाही. गावाच्या विकासामध्ये राजकारण येतं, राजकीय वादविवाद निर्माण होतात तेव्हा त्या गावाचा विकास बाधित होतो. म्हणून गावपातळीवर राजकीय ध्रुवीकरण असता कामा नये; हे माझे स्पष्ट मत आहे. तरीही स्वार्थापोटी काहीजणांनी-काही कुटुंबांनी वर्षानुवर्षे राजकीय पक्षाच्या बॅनरखाली आपला स्वतःचा विकास साधून घेतला; तोही ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या माध्यमातून. आजच आम्ही हे परखडपणे मांडले असं नाही. गेली कित्येक वर्षे स्पष्टपणे-परखडपणे गावाच्या विकासासाठी आवश्यक आहे, ते मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो. पण आमची भूमिका कित्येक वर्ष स्वार्थ जपणाऱ्या राजकीय पक्षाचा शिक्का मारून घेतलेल्या तथाकथित लोकांना आवडत नाही. मग ते अनेकविध मार्गाचा वापर करून खोटंनाटं सांगून आपली पोळी भाजून घेतात. असो. त्यांची पोळी त्यांना लखलाभ होवो! स्वतःच्या स्वार्थासाठी गावाला विकणाऱ्या तथाकथित बाजारबुजगावण्यांच्या विरोधात मी आता आणि भविष्यात बोललो नाही तर खोटा `इतिहास' पुढील पिढीसमोर उभा राहील आणि ते अधिक घातक असेल. इतिहास आपल्याला भविष्यात कसं वागायचं? हे शिकवितो. पण जर तो खोटा असेल तर त्यातून प्रगतीऐवजी अधोगती होऊ शकते. म्हणूनच खराखुरा इतिहास सगळ्यांसमोर येण्यासाठी जगात कित्येकांनी बलिदान दिलं आहे.      

सोसायटीची निवडणूक यावर्षी बिनविरोध झाली आणि असलदे गावात शिवसेना- भाजप हे प्रमुख पक्ष हरले. पक्षाच्या जिल्हापातळीवरील नेत्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. राजकीय पक्षांच्या चढाओढीतून नेहमीच गावात, वाडीत आणि भावकीत संघर्ष होत असतो आणि तो संघ भावनेला तडा देणारा असतो. हे माझं मतं आहे. पण गावातील तथाकथित पुढाऱ्यांनी २५-३० वर्षे हे घाणेरडे राजकारण करून असलदे गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गैरकारभार केला. आता मात्र हेच सर्व गावातील राजकीय पुढारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध कशी काय करू शकतात? ही सोसायटी आता शिवसेनेच्या ताब्यात आहे की भाजपच्या? ह्या प्रश्नांची उत्तरं आज उद्या मिळतीलच. पण आजतरी असलदेमध्ये शिवसेनेचा आणि भाजपचा पराभव झाला असं आमचं म्हणणं आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न शिवसेना व भाजप पक्षाच्या जिल्हापातळीवरील नेत्यांनी केला; तर आपले कार्यकर्ते पक्षाशी कशी गद्दारी करतात? हेही सहजपणे लक्षात येईल.   

शिवसेनेचा एक नेता गावामध्ये येतो आणि निवडणूक बिनविरोध होते. भारतीय जनता पार्टीला नेमकं कोणतं गाजर दाखविण्यात आलं?  कुठलाही पक्ष सोसायटीचे अध्यक्षपद आणि ग्रामपंचायतीचे सरपंचपद सोडणार नाही. असं असताना भारतीय जनता पार्टीने सहजासहजी सोसायटीचे अध्यक्षपद कसं सोडलं? हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. थोड्याच दिवसांनी जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे. ती निवडणूकसुद्धा आमच्या गावाचा आदर्श समोर ठेऊन बिनविरोध करावी! गावातील आमच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांना फसवलं! खरोखरच हे कौतुकास्पद आहे, अभिनंदनीय आहे. 

बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांनी जे २५-३० वर्षात झाले नाही; ते करायचे आहे. सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकास कसा होईल? गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थ सोसायटीचे सदस्य कसे होतील? गावात सहकारी तत्वावर कोणत्या योजना राबवल्या जाऊ शकतील? ह्याचा अभ्यास करून नियोजन करायला हवे. पुढील पाच वर्षात सर्वांनी मिळून उत्तम काम करा, विकासाचे आदर्श मॉडेल उभे करा; जेणेकरून ह्या संचालक मंडळातील काही संचालक भविष्यात तालुका संघात, कृषी समितीत, जिल्हा बँकेत संचालक होतील. त्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा! चांगल्या कामाचे नक्कीच कौतुक करू! वैयक्तिक राग-द्वेष आम्ही ठेवत नाही आणि गावाच्या विकासाच्या आड येणाऱ्यांची गय करणार नाही; मग तो कोणीही असो!   

पुन्हा लवकरच ह्या माध्यमातून भेटू! 


-नरेंद्र हडकर 

संपादक- पाक्षिक स्टार वृत्त

Comments