विनोद तांबे आणि सचिन लोके यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना!


https://starvrutta.com/editorial-sachin-lokes-innovative-concept/


कणकवली तालुक्यातील असलदे गावातील उगवतीवाडीत श्री. सचिन लोके यांनी यावर्षी एक नाविण्यपूर्ण शेतीविषयक यशस्वी प्रयोग राबविला आहे. भातशेती आणि आंबा-काजू लागवडीच्या पलीकडे कधीही विचार न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कल्पनेला चालना देणारी संकल्पना श्री. सचिन लोके यांनी प्रत्यक्षात साकारली आहे. यावर्षी एका एकरात शेलम आणि SK 4 ( कोकण स्पेशल ४ जात ) ह्या जातीच्या हळदीची लागवड त्यांनी प्रायोगिक तत्वावर केली आहे. कुठल्याही रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने त्यांनी हळदीची लागवड केली आहे आणि आंतरपिक म्हणून कारल्याच्या वेलीही लावल्या आहेत. त्याचप्रमाणे चिबूड, भुईमूग, झेंडू, फागली ( कांटोली ), तुतीची झाडे (रेशमी शेतीसाठी) अशी आंतरपिके घेतली आहेत.


फागली ( कांटोली )

भुईमूग

हळद पिकाची वाढ पाहता हळदीचे कमीत कमी पाच हजार किलो उत्पन्न मिळेल; असा अंदाज श्री. सचिन लोके यांना आहे. शासनाचे कोणतेही अनुदान न घेता मुंबईत राहणाऱ्या तरुणाने केलेला प्रयोग भविष्यात स्थानिकांना `जे बाजारात विकेल ते कसं पिकवायचं' ह्याची शिकवणूक देणारा असेल. आजपर्यंत पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन स्थानिक शेतकरी विचारच करीत नाही. श्री. सचिन लोके यांनी हळद लागवड करून शेतकऱ्यांना दिली आर्थिक फायदा करून देणारी नाविन्यपूर्ण संकल्पना दिली. श्री. सचिन लोके यांच्यासारख्या तरुणांनी स्थानिकांसमोर समोर ठेवलेला आदर्श कौतुकास्पद आहे. आधुनिक शेतीतून गावातील शेतकऱ्यांचा पर्यायाने गावाचा आर्थिक विकास होऊ शकतो, त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन गट शेतीला प्राधान्य द्यावे आणि प्रामाणिकपणे मेहनत करावी; असे मत सचिन लोके व्यक्त करतात.

असलदे गावात अशाचप्रकारे शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम श्री. विनोद तांबे करीत असतात. सेंद्रिय शेतीचे प्रचंड ज्ञान, आधुनिक व नाविन्यपूर्ण शेतीच्या उपक्रमांची मनापासून आवड, सदैव कष्ट-मेहनत करण्याची तयारी, इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तत्परता असणारा विनोद तांबे यांच्यासारखा तरुण असो व सचिन लोके यांच्यासारखा गावाच्या उज्वल भविष्यासाठी क्रियाशील असणारा तरुण असो; हे तरुण खऱ्या अर्थाने गावाची शान आहेत. पत्ते-मटका असे जुगार खेळणाऱ्या तरुणांपेक्षा सचिन लोके, विनोद तांबे यांच्यासारख्या तरुणांची आवश्यकता गावाला अधिक आहे.

श्री. विनोद तांबे

कृषी खात्याने, सोसायटीने, ग्रामपंचायतीने, पंचायत समितीने, जिल्हा परिषदेने अशा होतकरू तरुणांना सर्वतोपरी सहाय्य करण्याची आवश्यकता आहे. जर त्यांना सहाय्य मिळाले तर ते शेतीमध्ये निश्चितपणे यशस्वी होतील आणि तो आदर्श घेऊन अनेक तरुण त्यांचा मार्ग स्वीकारून गावातच आर्थिक सुबत्ता निर्माण करतील. आजपर्यंत गावाच्या सोसायटीने असो वा कृषी खात्याने गावात प्रामाणिक होतकरू तरुण शेतकऱ्यांची टीम तयार केली नाही; हे अपयश आहे. ते अपयश दूर करण्यासाठीच आधुनिक नाविन्यपूर्ण शेतीचे प्रकल्प राबविणाऱ्या होतकरू तरुणांना कोणताही भेदाभेद न करता सर्वोतोपरी सहाय्य केले पाहिजे.

सचिन लोके यांची यावर्षी मे महिन्यात मोठ्या मेहनतीने उभी केलेली काजूची बाग जळली. बागेतील ५० टक्के काजूची झाडे जळल्यानंतरही सचिनने कोणावर दोषारोप न करता मोठ्या धैर्याने हिम्मतीने अधिक कष्ट केले आणि प्रगत शेतीचा मार्ग स्वीकारला. कुठल्याही संकटातून मार्ग काढून यशावर स्वार होण्याची त्यांची जिद्द सलाम ठोकण्यासारखीच आहे.

विनोद तांबे आणि सचिन लोके यांच्या नाविन्यपूर्ण शेतीप्रकल्पास शुभेच्छा!

-नरेंद्र हडकर

Comments