राजकीय फायद्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना ओळखता आले पाहिजे!

https://starvrutta.com/editorial-asalde-valli-alla-abacha-aaj-urs-mubarak/

असलदे वल्ली आल्ला आबाचा आज उर्स मुबारक! 

राजकीय फायद्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना ओळखता आले पाहिजे!


कणकवली तालुक्यातील असलदे गावात वल्ली आल्ला (र. अ.) बाबांचा उर्स मुबारक आज साजरा होत आहे; त्यानिमित्ताने सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा! त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख लिहिण्याचा प्रयास केला. 

देवगड निपाणी रस्त्यावर असलदे गावात गावठाणवाडीच्या स्टॉपसमोर वल्ली आल्ला (र. अ.) बाबाचा दर्गशरिक आहे. अतिशय निसर्गरम्य परिसरात असलेल्या पवित्र दर्ग्यात दरवर्षी होणार उर्स मुबारकला अनेक वर्षांची परंपरा आहे. ह्या ठिकाणी होणाऱ्या उर्स मुबारक असलदे आणि नांदगाव येथील मुस्लिम समाज बांधव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करतात. ह्यावेळी सिंधुदुर्गासह रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या जिल्ह्यातील भाविक मोठया प्रमाणावर उपस्थित राहून दर्शन घेतात. मुस्लिम बांधवांप्रमाणे हिंदु बांधवही ह्या उत्सवात सहभागी होत असतात. येथे येऊन नवस बोलणाऱ्यांची जशी मोठी गर्दी असते तशीच गर्दी नवस फेडणाऱ्यांची असते. त्यामुळे हिंदू मुस्लिम समाजात बंधुभाव जपणारा हा उत्सव असलदे पंचक्रोशीतील महत्वाचा उत्सव आहे. 

यादिवशी नांदगावातील मदिना मस्जिद सुन्नी जमात येथून संदल निघतो. फुलांची चादर घेऊन नांदगाव तिठ्ठ्यावर रातीब खेळला जातो. नंतर बाबांच्या दर्ग्यावर विधिवत पूजा करून नमाज पढून प्रसादाला सुरुवात होते. त्यानंतर नवीन नवस करण्याचा आणि नवस फेडण्याचा कार्यक्रम सुरु होतो. हा कार्यक्रम उशिरापर्यंत सुरु असतो. 

काही गावाचे राजकारणी पुढारी लोक नेहमीच हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वैर निर्माण करण्याचा गुपचूपपणे प्रयत्न करीत असतात आणि त्याचा राजकीय फायदा आपणास उठविता येईल? हे पाहत असतात. मात्र असलदे नांदगाव येथील हिंदू मुस्लिमांमध्ये शेकडो वर्षाचे ऋणानुबंध आहेत आणि ते ऋणानुबंध दोन्ही बाजूच्या बांधवानी जपले आहेत. असलदेतील हा दर्गा धार्मिक द्वेष कमी करून हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये बंधूप्रेम निर्माण करतो. 

नांदगाव तिठ्ठ्यावर पहिली रिक्षा करीम यांच्या वडिलांची. वडिलांनंतर स्वतः करीम यांनी ऑटोरिक्षाचा व्यवसाय स्वीकारला. त्या व्यवसायाच्या माध्यमातून नांदगाव पंचक्रोशीत रात्रीबेरात्री रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्याची सेवा करीमने आणि त्यांच्या वडिलांनी केली. आता प्रत्येकाच्या घरात चारचाकी-दोन चाकी वाहने आहेत. मोबाईल आहेत. त्यामुळे आताच्या पिढीला त्याचे गांभीर्य समजणार नाही. पण ३० वर्षांपूर्वी तशी परिस्थिती नव्हती. अशा प्रतिकूल परिस्थितीत करीम आणि त्याच्या वडिलांनी केलेली सेवा नांदगाव पंचक्रोशीतील जुने जाणते वयोवृद्ध लोक विसरणार नाहीत. ह्या सेवेमध्ये त्यांनी कधीही धर्म आणला नाही. ह्यालाच म्हणतात बंधुभाव! 

हिंदूंच्या सणाला मुस्लिमांनी जायचे आणि मुस्लिमांच्या सणाला हिंदूंनी जायचे; ही परंपरा नांदगाव पंचक्रोशीत आहे. एवढेच नाहीतर नांदगाव येथील मुस्लिम समाजातील स्त्रिया आमच्या असलदे गावात सुकी मासळी घरोघरी विकायला आणायच्या आणि अजूनही आणतात. त्यांच्याशी तर आमचं नातं व्यवहाराचं नसायचं तर प्रेमाचं असायचं. अजूनही ते प्रेमाचे नातं दोन्ही बाजूंनी जपलं गेलंय. 

मात्र वर नमूद केल्याप्रमाणे राजकारणी लोकांना असा बंधुभाव जपला गेला की राजकीय पोळी भाजता येत नाही. मग नको नको त्या समाज विघातक गोष्टी करायला ते करायला तयार असतात. मात्र अशा लोकांचा बंदोबस्त करणे सामान्यांना शक्य नसते; मात्र हिंदूं आणि मुस्लिमांची जी पवित्र दैवत त्यांचा बंदोबस्त निश्चित करतील; असा भाव अनेकांच्या मनात असतो. 

अनेक वर्षे असलदे गावी वल्ली आल्ला आबाचा आज उर्स मुबारक होत आहे; परंतु मुस्लिम बांधवांना आजपर्यंत ह्या उत्सवापुर्वी कधीही असलदे ग्रामपंचायतीत बोलाविण्यात आले नव्हते. मात्र ह्यावर्षी त्यांना का बोलाविण्यात आले? हा माझा प्रश्न आहे. नैतिकच्या गोष्टी करणाऱ्यांनी स्वतःचा गोवा बनावटीचा सुरु असलेला अनधिकृत दारू धंदा बंद करावा आणि सामाजिक भान ठेवावे. गावात येणाऱ्या क्रेशरला, भरवस्तीत उभ्या राहणाऱ्या मोबाईल टॉवरला, अनधिकृत दारू धंद्याला, महिलांना अपशब्द वापरणाऱ्या गुंडांना, निवडणुकीचा राग ठेऊन वाळीत टाकणाऱ्या आणि गावात दहशत पसरविणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांना आमचा नेहमीच विरोध होता, आहे आणि असेल. कोणीही कुठल्याही पक्षाचे पांघरून घेतले तरी हरकत नाही. त्या पक्षप्रमुखासमोर गावाच्या हितास बाधा आणणाऱ्यांना नागवे करू. असलदे म्हणा की नांदगाव पंचक्रोशी म्हणा; दोन धर्मात धार्मिक तेढ कधी नव्हते आणि नसेल. कारण असलदे गावातील हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेला देव रामेश्वर, पावणाई माता आणि चाळा तसेच मुस्लिम धर्मियांचा वल्ली आल्ला बाबा नेहमीच जागृत असतात.

मात्र आम्हाला राजकीय फायद्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना ओळखता आले पाहिजे! त्यासाठी सर्व धर्मियांनी सावध असलं पाहिजे. मगच खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिम धर्मीयांमध्ये बंधुभाव अधिकाधिक वाढू शकतो. 

पुन्हा एकदा वल्ली आल्ला (र. अ.) बाबाचा उर्स मुबारकच्या निमित्ताने सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!

-नरेंद्र हडकर

Comments